ठाणे : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव एकेरी घेणे हे आमच्या अस्मितेवरचा घाव आहे. संभाजी ब्रिगेड ही संघटना जर खरच महाराजांचा सन्मान करत असेल, तर त्यांनी आपले नाव बदलून ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड’ करावे. अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक होणार यात शंका नाही अशा इशारा शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक काटे यांनी संभाजी ब्रिगेडला दिला.
काही दिवसांपूर्वीच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर दीपक काटे यांच्यासह काहीजणांनी काळे फासत धक्काबुक्की केली होती. पुन्हा एकदा काटे यांनी इशारा दिल्याने वाद चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, दीपक काटे येणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मिळताच, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी काटे यांच्याविरोधात निदर्शने केली.
अक्कलकोट येथील एका कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे जात असताना शिवधर्म फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना अडविले. त्यांना धक्काबुक्की करून त्यांच्या चेहऱ्यावर काळे फासले होते. त्यानंतर पुन्हा एकदा काटे यांनी संभाजी ब्रिगेडला इशारा दिला.
ठाण्यात टीप टॉप येथे मंगळवारी दीपक काटे यांनी पत्रकार परिषद घेत संंभाजी ब्रिगेडवर टीका केली.
नावात सन्मान असतो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते. त्यांचे बलिदान, त्यांचा धर्माभिमान, त्यांची निष्ठा यामुळे आज आम्ही अभिमानाने मराठा म्हणून उभे आहोत. त्या महापुरुषांचे नाव जपणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. पण ब्रिगेडचे पदाधिकारी याकडे राजकीय फायद्याच्या दृष्टिकोनातून बघत असल्याचे दिसत आहे असा आरोप काटे यांनी केला.
अन्यथा तीव्र प्रतिक्रिया उमटतील
महाराजांविषयी जराही अपमानकारक उल्लेख झाला, तर शिवधर्म फाउंडेशन शांत बसणार नाही. आमच्या भावना शाबूत आहेत. संभाजी ब्रिगेडने अजून वेळ घालवू नये. नाव बदलून इतिहासाची आणि शिवप्रेमींची प्रतिष्ठा राखावी. अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या तर त्याची जबाबदारी त्या संघटनेवरच राहील असा इशाराही त्यांनी दिला. हा विषय केवळ नावाचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे. धर्मवीर संभाजी महाराज हे केवळ इतिहासपुरते उरले नाहीत, ते आमच्या रक्तात आहेत. त्यांच्या नावाशी छेडछाड सहन केली जाणार नाही. वारंवार मागणी करूनही संभाजी ब्रिगेडने नाव बदलण्याकडे दुर्लक्ष केल्याने असंतोष वाढतो आहे असेही संघटनेचने स्पष्ट केले.
शिवधर्म फाऊंडेशनची पत्रकार परिषदेत फाऊंडेशनचे संस्थापक दीपक काटे येणार असल्याचे समजताच, संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी काटे यांच्या विरोधात निदर्शन केली. दरम्यान, वागळे इस्टेट पोलिसांनी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.