संत साहित्य, नामभक्ती आणि समाज प्रबोधनाचा अखंड तेजोमय दीप प्रज्वलित करणाऱ्या भक्तशिरोमणी संत श्रीनामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त, “संत श्री नामदेव महाराज फड संस्थान व संत वंशज, पंढरपूर” यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा. श्री. एकनाथ शिंदे यांना “भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार २०२५” जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात संतशक्तीचा व शासनसत्तेचा समन्वय साधत, वारकरी संप्रदायाचे सक्षमीकरण, कीर्तनकारांचा गौरव, दिंड्यांना शासनमान्यता, आणि वारी प्रबोधन सेवा रथ यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे शिंदे यांनी समाजसेवा व अध्यात्माची खरी पताका उंचावली आहे. संत नामदेव महाराज जसे पंजाब, महाराष्ट्र, व उत्तर भारतात आपली संत परंपरा पोहचवणारे झाले, तसेच एकनाथ शिंदे यांनी आजच्या युगात ‘संतविचारांचा शासनसत्तेतुन जागर’ घडवला आहे. त्यांच्या अध्यात्मिक क्षेत्रातील अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांना अशा प्रकारे इतिहासातील प्रथमच पुरस्कार देऊन आम्ही त्यांना सन्मानित करणार आहोत. असे मत उत्सव प्रमुख श्री निवृत्तीमहाराज नामदास यांनी व्यक्त केले.
या पुरस्काराच्या माध्यमातून संतमहिमा व शासनसत्तेचा संगम घडवणाऱ्या शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराजांचा आशीर्वाद लाभणार आहे अशी भावना वारकरी संप्रदायातून प्रकट होत आहे.
हा गौरव सोहळा गुरुवार, दिनांक २४ जुलै २०२५ रोजी दुपारी ०२.०० वा. श्री केशवराज मंदिर, संत नामदेव महाराज वाडा, पंढरपूर येथे संपन्न होणार असून, या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातील संत वंशज, फड परंपरेचे प्रमुख, वारकरी संप्रदायाचे मान्यवर, कीर्तनकार, पंजाब व उत्तर भारतातील भक्त उपस्थित राहणार आहेत.
संत नामदेव महाराजांच्या तीन पिढ्यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे प्रत्यक्ष निमंत्रण शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई येथील निवासस्थानी देण्यात आले.