ठाणे महापालिका, सोसायटी जनरल आणि भागीरथ संस्थेचा स्तुत्य उपक्रम
ठाणे :- 22 मे या जागतिक जैवविविधता दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील ऐतिहासिक मासुंदा (तलाव पाळी) तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी ठाणे महानगरपालिका, सोसायटी जनरल आणि ‘भागीरथ’ संस्थेने हाती घेतलेला पर्यावरणपूरक उपक्रम विशेष लक्षवेधी ठरत आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला असून या उपक्रमामुळे तलावातील जैवविविधतेचे संवर्धन आणि जलस्रोतांचे संरक्षण करण्यास मोठी मदत होणार आहे.
सध्या शहरी आणि निमशहरी भागातील जलस्रोत घरगुती कचरा, सांडपाणी, पोषक तत्त्वांचे अतिप्रमाण (न्यूट्रिएंट ओव्हरलोडिंग) तसेच सेंद्रिय प्रदूषकांमुळे मोठ्या प्रमाणावर दूषित होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रदूषित जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ‘फायटोरेमेडिएशन’ अर्थात वनस्पतींच्या साहाय्याने पाणी शुद्ध करण्याची पद्धत प्रभावी, शाश्वत आणि किफायतशीर उपाय म्हणून पुढे येत असल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी सांगितले.
ठाणे महानगरपालिकेच्या जलस्रोत पुनरुज्जीवन मोहिमेला हातभार लावण्यासाठी सोसायटी जनरलच्या CSR निधीतून आणि त्यांच्या सहयोगी स्वयंसेवी संस्था ‘भागीरथ’ यांच्या माध्यमातून मासुंदा तलावात ‘फ्लोटिंग वेटलँड्स’ म्हणजेच तरंगती वनस्पती बेटे उभारण्यात आली आहेत. यासाठी Canna indica या वनस्पतींचा वापर करण्यात आला आहे. तसेच तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी कॅस्केड एअरेटर्स आणि सबमर्सिबल मिक्सर्स कार्यान्वित करण्यात आले आहेत.
या संपूर्ण उपक्रमाला ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे. या नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक पद्धतीमुळे मासुंदा तलावातील पाण्याचा दर्जा सुधारण्यास, तलावाचे सुशोभीकरण करण्यास तसेच तेथील जैवविविधतेचे रक्षण करण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
जागतिक जैवविविधता दिनानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धन, जलस्रोत संरक्षण आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

