ठाणे : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील शुभ दीप निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत ठाण्यात आमचा काॅप तरी करा… अशी विनंती रामदास आठवले आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. परंतु शिंदे यांनी भाजपसोबत युती झाल्याचे सांगितले. तसेच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचेही ते म्हणाले.
महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीतील रिपब्लिकन पक्षाला सन्मानजनक जागा मिळत नसल्याने रामदास आठवले यांनी स्वबाळाचा निर्णय जाहीर केला होता. बुधवारी रामदास आठवले हे पदाधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी गेले होते. मुंबईसह इतर महापालिका निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला भाजप आणि शिवसेनेकडून काही वाढीव जागा मिळाव्यात याबाबत चर्चा करण्यात आली.
तसेच इतर महापालिकांमध्येही रिपब्लिकन पक्षाला देण्यात आलेल्या जागांबाबतही चर्चा झाली. यासोबतच मुंबई जिल्हा नियोजन समिती सहित इतर समित्यांवर पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामावून घ्यावे अशी मागणी आठवले यांनी शिंदे यांच्याकडे केली. याबाबत रिपब्लिकन पक्षाकडून यादी मिळाल्यास सकारात्मक राहून समित्यांमध्ये प्राधान्याने रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामावून घेऊ असे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी ठाण्यात आमचा काॅप तरी करा… अशी विनंती देखील शिंदे यांनी केली.

