- हिरानंदानी पार्क १चे रहिवासी रस्त्यावर
- आमदार संजय केळकर यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांना खडसावले
सेवा रस्ता हा मुख्य रस्त्याला जोडून घोडबंदर मार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम स्थानिकांचा विरोध डावलून सुरू आहे. आज येथील रहिवाशांचा संताप अनावर झाल्याने हिरानंदानी पार्क १च्या रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. याबाबत माहिती मिळताच आमदार संजय केळकर यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांची बाजू ऐकली. त्यांनी तत्काळ एमएमआरडीए अधिकाऱ्यांना फोन करून लोकांना विश्वासात न घेता काम सुरू करू नका, अशी सूचना केली. हे काम थांबविण्यात आल्याने तूर्त तणाव निवळला आहे.
तीन महिन्यांपासून घोडबंदर मार्गावर सेवा रस्ता आणि मुख्य रस्ता जोडून महामार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. या रुंदीकरणाला या मार्गालगतची सर्व गृहसंकुले, आस्थापना आणि शाळांचा विरोध आहे. नागरिकांनी या निर्णयाविरोधात आक्रोश बैठकही घेतली. त्यावेळी आमदार संजय केळकर यांनी नागरिकांची भेट घेऊन त्यांची बाजू ऐकली तसेच लोकांच्या भावना एमएमआरडीए अधिकाऱ्यांना कळविल्या. सेवा रस्ता मुख्य रस्त्याला जोडणे हे बेकायदेशीर असल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले. तरीही प्रशासनाकडून रुंदीकरणाचे काम थांबविण्यात आले नाही.
अखेर आज हिरानंदानी पार्क १ समोरील रुंदीकरणाचे काम सुरू असताना येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. याबाबत नागरिकांनी आमदार संजय केळकर यांना कळविल्यानंतर श्री. केळकर यांनी धाव घेत नागरिकांचे म्हणणे ऐकले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय काम सुरू करू नका, असे सुनावले.
यावेळी श्री. केळकर म्हणाले, या मार्गालगतची गृहसंकुले, वाणिज्य आस्थापना आणि शाळा यांना सेवा रस्ता हा एकमेव आधार होता. या सेवा रस्त्यावरून नागरिकांना विशेषतः लहान मुले, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करता येत होती. परंतु सेवा रस्ता मुख्य मार्गाला जोडल्याने अपघात होऊन जीवितहानी होण्याचे प्रमाण वाढणार आहे. याबाबत मी अधिकाऱ्यांशी बोलून नागरिकांच्या भावना कळविल्या आणि त्यांचा विरोध असल्याने हे रुंदीकरण थांबवावे तसेच त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय रुंदीकरण करू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत, असे श्री. केळकर म्हणाले.

