ठाणे महानगरपालिका आयोजित संगीतभूषण पं. राम मराठे महोत्सवास शुक्रवारपासून सुरूवात

ठाणे :- नृत्य, वादन, गायन आणि संगीत नाटक असे विविध कलाविष्कार असलेला 30 वा संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोह उद्यापासून (5डिसेंबर) राम गणेश गडकरी रंगायतन येथे सुरू होणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्यावतीने 5 ते 7 डिसेंबर 2025 या दरम्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून

रसिकांना शास्त्रीय गायनाबरोबरच कथ्थक नृत्य, संगीत नाटकाची मेजवानी मिळणार आहे. ‍ तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या विनामूल्य प्रवेशिका नाट्यगृहावर उपलब्ध असून रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

        शुक्रवार 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.00 वा. महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. आपल्या अनेक दशकांच्या समृद्ध गायनप्रवासाने महाराष्ट्राच्या संगीत परंपरेला अमूल्य योगदान  देणाऱ्या  व आपल्या आवाजातील माधुर्य, श्रुतीसाधना, स्पष्ट उच्चार व भावपूर्ण अभिव्यक्तीमुळे आपण महाराष्ट्राची एक मानबिंदू कलावंत म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आशा खाडीलकर यांना संगीतभूषण पं. राम मराठे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रोख रुपये 51,000/- सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.  कथ्थक या अभिजात भारतीय नृत्यप्रकाराच्या युवा साधक म्हणून संगीताची साधना करणाऱ्या निधी प्रभू यांना पं. राम मराठे युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख रुपये 25,000/- सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रात्री 8.00 वा. होणार आहे. तद्नंतर रात्री 8.30 वा. पं. सुरेश बापट यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना तबल्यावर सुहास चितळे व हार्मोनियमवर नीला सोहोनी साथसंगत करणार आहेत.

       महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवार दि. 6 डिसेंबर  रोजी  सायं. 5.00. श्री. राजेंद्र गांगाणी  यांचे  कथ्थक नृत्य सादरीकरण आहे. रात्री. 8.00 वा. गायिका आरती अंकलीकर यांच्या गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे.  त्यांना तबल्यावर रोहित देव, तर हार्मोनियमवर सिध्देश बिचोलकर साथसंगत करणार आहे. तर रात्री 9.45 वा. उस्ताद शाहीद परवेझ यांचा सितारवादनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना तबल्यावर उन्मेष बॅनर्जी साथसंगत करणार आहेत.

         तर रविवार 7 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वा. वैशाली पोतदार यांच्या नृत्याचा कार्यक्रम सादर होणार आहे. सकाळी 11.00 वाजता सावनी पारेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना तबल्यावर प्रसाद पाध्ये, हार्मोनियमवर राजस खासगीवाले, पढंतवर जुई पाठक तर गायनासाठी अर्चना गोरे साथसंगत करणार आहे.  दुपारी 12.00 वाजता पं. अनंत जोशी यांचा हार्मोनियम वादनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना समीर गानू, अक्षय अभ्यंकर, अभय दातार साथसंगत करणार आहेत. तर दुपारी 3.00 वाजता वाघांबे, गुहागर येथील संवेदना आर्टस निर्मित ‘जय जय गौरीशंकर’  हे संगीत नाटक सादर होणार आहे. रात्री 8.00 वा. पद्मश्री पं.सुरेश तळवलकर हे वादन सादर करणार असून त्यांना सावनी तळवलकर- तबल्यावर अभिषेक शिनकर,  हार्मोनियमवर नागेश आडगावकर,  गायनासाठी रोहित खवळे,  पखवाजवर ईशान परांजपे,  कहोजवर ऋतुराज हिंगे, तर अभिषेक भुरूक  ड्रम्स वर साथसंगत करणार आहे. रात्री 9.30 वा. पं. राजा काळे यांचा गायनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना तबल्यावर मंदार पुराणिक तर हार्मोनियमवर सिध्देश बिचोलकर साथसंगत करणार असून या कार्यक्रमाने समारोहाची सांगता होणार आहे.

        ‍तीन दिवस सुरू असणाऱ्या महोत्सवास उपस्थित राहणाऱ्या रसिक प्रेक्षकांमधून प्रत्येक दिवशी एक भाग्यवान (लकी ड्रॉ) रसिक ‍निवडला जाणार असून त्या रसिकास भेटवस्तू दिली जाणार आहे. तरी ठाणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top