ठाण्यात १० हजार दुबार, ६ हजार मतदार एकच नावाने, ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांचा गंभीर आरोप

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीसाठी नुकताच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमधील महत्त्वाच्या गंभीर चुका असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केला. ठाणे महापालिका हद्दीत १० हजार ६५३ दुबार मतदार, वेगवेगळ्या प्रभागात ६ हजार ६४९ एकच नावे, फक्त नाव आणि आडनाव असलेले ३ हजार ४८५ मतदार याद्यांमध्ये आहेत. ठाणे पालिकेच्या या प्रारुप मतदार यादीमध्ये झोल असून गंभीर चुका असताना जिल्हा निवडणुक आयोग तसेच पालिकेचे निवडणुक अधिकारी गप्प का? असा सवाल विचारे यांनी पत्रकार परिषदेत केला.

माजी खासदार राजन विचारे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत आरोप केले. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी २० नोव्हेंबरला प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यावर हरकती व सूचना देण्यासाठी २७ नोव्हेंबर शेवटची तारीख ठरवण्यात आली. परंतु ठाणे महापालिकेने मतदार यादी देण्यास उमेदवारांना विलंब होत असल्याने निवडणूक आयोगाने हरकती घेण्याची ३ डिसेंबर अशी करण्यात आली.

या सर्व प्रभागाच्या याद्या घेण्याकरिता गेले असताना असे लक्षात आले की संपूर्ण याद्यांच्या एकत्रीकरण पुस्तके बनवून गठ्ठे देण्यात आले. हे गठ्ठे फोडून पुरवण्या जोडून याद्या तयार करायला दोन ते तीन दिवस लागले. त्यानंतर प्रत्यक्ष काम करताना अनेक अडचणी येऊ लागल्या असल्याचे मत विचारे यांनी व्यक्त केले. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत मतदार यादीतील घोळ असलेले पुरावे देण्यात आले.

निवडणुक आयोग सरकारचे बटिक म्हणून काम करत
ठाण्यात मतदार यादी मधील गोंधळ मोठ्या प्रमाणात असल्याने एवढ्या कमी कालावधीमध्ये त्याच्या हरकती घेता येणे शक्य नसल्याने राजन विचारे यांनी सॉफ्टवेअरद्वारे निवडणूक आयोगाच्या काही चुका शोधून काढल्या. या चुका इतक्या गंभीर आहेत की निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे नावे घुसविण्यात आले असल्याचा आरोप राजन विचारे यांनी केला. तसेच निवडणुक आयोग सरकारचे बटिक म्हणून काम करत असून निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रभागात न जाताच ‘एसी’ कार्यालयात बसुन मतदार याद्या बनवल्या असल्याचा आरोप विचारे यांनी केला.

आरोप काय?
१) संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात मतदाराचे नाव किंवा आडनाव असलेले एकूण ३ हजार ४८५ असे Epic नंबर सहित यादी दाखवण्यात आली
२) संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात मतदार यादीत नाव नसलेले परंतु Epic वोटर आयडी असलेले एकूण १ हजार ५७५ दाखविण्यात आले व त्यांची यादी ही दाखवण्यात आली.
३) संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रातील ३३ प्रभागांमध्ये प्रत्येक प्रभागात किती मतदार दुबार अजून आहे परंतु दाखवण्यात आले नाही असे १० हजार ६५३ उदाहरणासहित दाखविण्यात आले.
४) संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रातील 33 प्रभागांमध्ये एकच नाव असलेली व्यक्ती दोन दोन प्रभागांमध्ये असलेले एकूण मतदार ६ हजार ६४९ असे उदाहरणासहित दाखविण्यात आलेले आहे.
५) संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रातील एकच वोटर आयडी दोन वेगवेगळ्या प्रभागांमध्ये व भिन्न विधानसभेत आढळून आलेले दोन मतदार कसे असू शकतील त्याचे उदाहरण दाखविण्यात आले. परंतु याची सखोल पडताळणी केल्यानंतर मागील झालेल्या विधानसभेला ही नावे एकूण ८ हजार ६०९ इतका मोठा आकडा होता. ही नावे अंतिम यादी ला पुन्हा टाकण्यात आल्याचा संशय विचारे यांनी व्यक्त केला.
६) ठाणे महापालिका हद्दीतील एका यादीवर पूर्णपणे काम केल्यानंतर असे लक्षात आले की एकूण मतदार १ हजार ८१ असे आहे त्यातील ओळख पटणारे ६७६ तसेच मृत २१ त्याचबरोबर ओळख पटतच नाही. परंतु इतर प्रभागातून टाकण्यात आलेली एकूण ३८४ नावे निदर्शनास आली आहे.
७) शंभर वर्षापेक्षा जास्त वय असलेले ५६२ मतदार आढळून आले आहेत. त्यामध्ये काहींचे वय कमी आहे परंतु १०४ वय दाखवलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top