२५ वर्षांनंतर ठाण्यात इतिहासाची पुनरावृत्ती; शिंदेंनी दिली भीम–शिवशक्ती एकतेची घोषणा
आनंदराज बाबासाहेबांचे रक्त, आम्ही विचारांचे भक्त
रिपब्लिकन सेनेच्या 11 व्या वर्धापन दिनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गर्जना
ठाणे, ता. 21 : २५ वर्षांपूर्वी याच ठाण्यात आनंद दिघे साहेबांनी भीमशक्ती आणि शिवशक्तीची मुहूर्तमेढ रोवली होती. आमची झालेली युती ही खुर्ची मिळवण्यासाठी नव्हे, तर सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आहे. आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांचे रक्त आहेत आणि आम्ही बाबासाहेबांचे विचारांचे भक्त आहोत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ठाण्यातील तलावपाळी येथील शिवाजी मैदानात रिपब्लिकन सेनेच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, युवा नेते ॲड. अमन आंबेडकर, माजी नगरसेवक रामभाऊ तायडे, आबासाहेब चासकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, संजीव बावधणकर, बाळासाहेब ओव्हाळ, सुनील वाघेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की, “या ठिकाणी शिवाजी महाराजांचे मैदान आणि शेजारी आनंद दिघे साहेबांचा स्मारक टॉवर आहे. हे ठिकाण स्वतः शक्तीस्थान आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकत्र आल्या हा योगायोग नसून इतिहास घडत आहे.”
बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जगातलं सर्वोत्तम संविधान दिलं. त्या घटनेमुळे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीलासुद्धा सर्वोच्च स्थान मिळू शकते, असे सांगत त्यांनी उदाहरणादाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वतःचा उल्लेख केला.
“मी शेतकऱ्याचा मुलगा असूनही आज राज्याचा मुख्यमंत्री आहे, आणि नरेंद्र मोदी हे देखील पंतप्रधान झाले हे बाबासाहेबांच्या संविधानामुळेच शक्य झाले आहे,” असे त्यांनी नमूद केले.
आनंदराज आंबेडकरांविषयी बोलताना शिंदे म्हणाले, “त्यांनी कुठल्याही अटीशर्ती न ठेवता युती केली. माझ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे हीच त्यांची एकमेव मागणी होती. ही युती सत्तेसाठी नाही, तर दलित, वंचित, शोषित आणि अन्यायग्रस्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आहे.”
यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या विचाराचा उल्लेख करून भीमशक्ती–शिवशक्तीची युती ही वज्रमुठ असल्याचा दावा केला.
बाबासाहेबांच्या कार्याची जपणूक व गौरव करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी इंदू मिल स्मारकाचे कामे वेगाने सुरू असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र भूषण राम सुतार बाबासाहेबांचा पुतळा लवकरच उभारणार, असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळात सर्वसामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. “लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही. आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत,” असे त्यांनी खात्रीपूर्वक सांगितले.
आगामी निवडणुकांचा उल्लेख करताना त्यांनी कार्यकर्त्यांना एकजूट ठेवण्याचे आवाहन केले आणि शेवटी “जय भीम, जय महाराष्ट्र आणि जय हिंद” अशा घोषणांनी भाषणाची सांगता केली.
…..

