ठाण्यात प्रथमच 5G रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा
ठाणे, दि.१३ (प्रतिनिधी)
प्रगत तंत्रज्ञान युगात वैद्यकीय क्षेत्रात गतिमान प्रगती झाली असून प्रथमच 5 जी तंत्रज्ञानयुक्त रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा आता ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील टायटेन मेडिसिटी रुग्णालयात उपलब्ध झाली आहे. टायटन मेडिसिटीमध्ये अभिनव टेली रोबोटिक द्वारे किफायतशीर दरात कमी जखम आणि कमीत कमी वेदना देणाऱ्या पाच जटील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या. अशी माहिती टायटेन मेडिसिटीचे संचालक डॉ.अब्रार खान यांनी गुरुवारी (ता.१३ नोव्हे.) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रुग्णालयाचे संचालक सर्जन डॉ.प्रदीप त्रिपाठी, रोबोटिक सर्जन डॉ. राकेश कटना आणि डॉ.अर्जुन सिंग उपस्थित होते.
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील टायटन मेडिसिटी हे रुग्णालय रुग्णांसाठी नेहमीच वरदान ठरले आहे. या रुग्णालयात प्रथमच रोबोटिक 5 जी सर्जिकल शस्त्रक्रियेचे तंत्रज्ञान उपलब्ध करण्यात आले आहे. याविषयीची माहिती डॉ. अब्रार खान यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, रोबोटिक तंत्रज्ञानाने ब्रेन संबधी शस्त्रक्रिया करू शकत नसलो तरी यूरोलॉजी, कर्करोग, स्त्री रोग, गॅस्ट्रो, आतड्यांसंबंधीचे आजार, बॅरिएट्रिक आणि कार्डियाक- थोरॅसिक आणि कोलोरेक्टल शस्त्रक्रिया करण्याची सर्वात प्रगत अत्याधुनिक रोबोटिक प्रणालीची सुविधा टायटन मेडिसिटी रुग्णालयाने सुरू केली आहे. त्यामुळे या प्रणालीचा लाभ हजारो रुग्णांना होणार आहे. 5G तंत्रज्ञानाचा वापर करून, अतिशय कुशल सर्जन दूरवरून देखील रोबोटिक शस्त्रक्रिया करू शकणार असल्याने दूरच्या रुग्णांवर देखील उपचार करता येणार आहेत. इतर रोबोटिक सर्जिकल केंद्रांपेक्षा टायटन मेडिसिटीमधील किंमत अधिक परवडणारी आहे. रोबोटिक इन्स्टॉलेशन केल्यानंतर पहिल्याच आठवड्यात पाच जटिल शस्त्रक्रिया अचूकपणे करण्यात आल्या आहेत. कमीत कमी वेदना व कमी जखम करून टेली रोबोटिक द्वारे जलदगतीने होणाऱ्या अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर संसर्गाचा कोणताही धोका उद्भवत नाही, शिवाय रक्तस्त्राव देखील कमीतकमी होत असल्याने रुग्णाला कोणताही मानसिक व शारीरिक त्रास होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. ठाण्यातील टायटन मेडिसिटी रुग्णालयातील रोबोटिक सर्जिकल प्रणाली ठाणे, मुंबईतील सर्वाधिक परडवडणारी, प्रगत रोबोटिक सर्जिकल सेंटर ठरणार असल्याचा दावा डॉ. राकेश कटना यांनी यावेळी केला.

