ठाणे : ठाण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग व बालरोग उपचार केंद्र डॉ. बेडेकर हॉस्पिटल आपले अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असून, या निमित्ताने डॉ. बेडेकर हॉस्पिटल आणि प्राच्यविद्या अभ्यास संस्था, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दुर्मिळ चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ब्रिटिश अधिकारी ऑटो रोथफेल्ड यांनी लिहिलेल्या “द वूमन ऑफ इंडिया” (१९२०) या ग्रंथावर आधारित असून, त्यातील तत्कालीन भारतातील विविध प्रांतांतील स्त्रियांच्या वेशभूषांचे चित्रण प्रख्यात चित्रकार एम. व्ही. धुरंधर यांनी केले आहे.
हे प्रदर्शन १३, १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत जोशी बेडेकर कॉलेज (ठाणे कॉलेज) च्या प्रांगणात भरविण्यात आले आहे. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन थोरले बाजीराव पेशवे सभागृहात “प्राचीन भारतातील स्त्रिया” या विषयावर प्रा. अंकुर काणे यांच्या व्याख्यानाने झाले. या प्रसंगी डॉ. विजय व्ही. बेदकर, डॉ. महेश व्ही. बेदकर, डॉ. आनंद व्ही. बेदकर, प्राचार्य सुचित्रा नाईक आणि असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या प्रदर्शनात “द वूमन ऑफ इंडिया” या ग्रंथाची मूळ प्रत देखील ठेवण्यात आली आहे. या पुस्तकात ४५ ते ४७ विविध वेशभूषांतील भारतीय स्त्रियांची चित्रे असून, त्यामधून त्या काळातील संस्कृती, प्रांतीय वैशिष्ट्ये आणि सामाजिक विविधता सुंदरपणे उलगडली आहे.विद्या प्रसारक मंडळाचे ध्येय उत्तम विद्यार्थी घडवणे हे असून या प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, संस्कृतीची जाण आणि नागरिकत्वाचे भान निर्माण व्हावे हा उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य सुचित्रा नाईक यांनी केले.दरम्यान या प्रदर्शनाचा उद्देश विद्यार्थ्यांना धुरंधर यांच्या कलाकृतींची ओळख करून देणे व भारतीय संस्कृतीबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे असे डॉ. महेश बेडेकर यांनी सांगितले.

