ठाणे :- पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वनशक्ती संस्था आणि मो. ह. विद्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने आज ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात ‘वृक्षबंधन’ हा आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी परिसरातील विविध देशी वृक्षांना राखी बांधून वृक्षांचे रक्षण, संवर्धन आणि पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश दिला. मोह विद्यालयाचे ४० विद्यार्थी, वनशक्ती संस्थेचे सदस्य , शिक्षकवर्ग, पर्यावरणप्रेमी आणि पत्रकारांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांनी शाडू माती, धान्य, सुकलेली फुलं, जुन्या कागदांचा पुनर्वापर, कापड, दोऱ्या आणि बिया वापरून पर्यावरणपूरक राख्या आणि बीज राख्या तयार केल्या. या राख्या संपूर्णपणे जैवविघटनशील असून पर्यावरणस्नेही होत्या. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जबाबदारीची भावना आणि सर्जनशीलता निर्माण झाली.
या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यफूल ताम्हण तसेच पिंपळ, हिरवी सावर, कदंब सारख्या देशी वृक्षांना राखी बांधून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला. हे वृक्ष पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत मौल्यवान आहेत.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी राखीची पालखी साकारली आणि ती तलाव परिसरात मिरवण्यात आली. पालखीच्या सोबतीने “झाडे लावा, झाडे जगवा”, “निसर्गाचे रक्षण करा”, “पर्यावरण संवर्धन करा”, “देशी वृक्षांचे जतन करा” अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषवाक्यांनी परिसरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली.
वनशक्ती संस्थेच्या पुढाकाराने या वर्षी ठाण्यातील कै. द. ल. मराठे विद्यालय, डोंबिवली येथील रा. वी. नेरुरकर विद्यालय आणि कृष्णा खामकर विद्यालाय, बदलापूर येथे पर्यावरण पूरक राखी तयार करण्याच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. या उपक्रमांमुळे सुमारे ४५० सहभागी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाशी आत्मीयता आणि कृतीशीलता निर्माण झाली आहे.
ठाण्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच ठाणे खाडी यांसारखे दोन संरक्षित क्षेत्र लाभले आहेत, त्यामुळे ठाणे शहर वृक्ष वैविध्याने संपन्न आहे. “वृक्षबंधन’ या उपक्रमामागचा उद्देश म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजात पोहोचवणे, भारतीय देशी वृक्षांचे महत्त्व समजावणे आणि सणांमध्ये शाश्वतता व नैसर्गिकता जपणे हा होता.
चित्रा म्हस्के, प्रकल्प अधिकारी – वनशक्ती
हा उपक्रम केवळ राखी बांधण्यापुरता मर्यादित नसून, तो निसर्गाशी एक आपुलकीचं नातं जपण्याचा, आणि भावी पिढ्यांना पर्यावरण रक्षणाचा विचार पोहोचवण्याचा सशक्त प्रयत्न ठरला , यासारखे अनेक उपक्रम आयोजित करण्यासाठी मो. ह. विद्यालय नेहमी पुढाकार घेईल.
– विकास पाटील, प्राचार्य, मो. ह. विद्यालय ठाणे.