दि. ३० (जिल्हा परिषद, ठाणे) – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने “अखिल भारतीय शिक्षा समागम सप्ताह” साजरा केला जात आहे. या निमित्ताने समग्र शिक्षा – समावेशित शिक्षण उपक्रम, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद ठाणे आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २९ जुलै, २०२५ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथे विशेष वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात अस्थिव्यंग, वाचादोष, कर्णदोष, दृष्टीदोष, मतिमंद, बहुविकलांग अशा विविध प्रकारच्या विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी व मूल्यांकन करण्यात आले. हे शिबिर केवळ तपासणीसाठी न राहता, मुलांच्या विशिष्ट गरजांचे अचूक आकलन करून त्यांना सहाय्यक उपकरणे, उपचार, लवकर हस्तक्षेप सेवा आणि घर आधारित शिक्षण यांशी जोडण्याच्या उद्देशाने राबवण्यात आले.
कार्यक्रमास शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महागडे, तसेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई येथील रूपाली सावंत, ऋत्विक, सताक्षी यांनी उपस्थिती दर्शवली. त्यांनी विद्यार्थ्यांशी, पालकांशी आणि उपस्थित वैद्यकीय अधिकारी व शिक्षकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
या शिबिरात ५० विशेष गरजाधारक विद्यार्थी, ५५ पालक, ९ विशेष शिक्षक, ४ विशेष तज्ज्ञ व जिल्हा समन्वयक सहभागी झाले होते. अंध, दृष्टीदोष, कर्णदोष, वाचादोष, बौद्धिक अक्षम व अस्थिव्यंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होता.
या उपक्रमाचे समन्वयक म्हणून अनिल कुर्हाडे, भरत वेखंडे, अरुणा पाटील (समावेशित शिक्षण – जिल्हा समन्वयक, जिल्हा परिषद ठाणे), विनोद जोशी, रोशन पाटील (जिल्हा कार्यक्रम समन्वयक – राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम) यांचे विशेष योगदान लाभले. भिवंडी व कल्याण गटातील विशेष शिक्षक व तज्ज्ञांनी शिबिराच्या आयोजनात मोलाची भूमिका बजावली.
कार्यक्रमास मुख्य मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, मुरबाड व शहापूर गटांतील विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. 31 जुलै 2025रोजी तसेच 1, 2 व 4 ऑगस्ट 2025 रोजी वैद्यकीय तपासणी शिबिरांचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे येथे करण्यात आले आहे.
शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त पुढाकारामुळे शैक्षणिक समावेशासाठी गरज असलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवा थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न यशस्वी ठरत आहे.