रायगड उत्खननात सापडले ‘यंत्रराज’; रायगडाच्या बांधकामामागे खगोलशास्त्राचा आधार असल्याचा पुरावा

रायगड :- दुर्गराज रायगडाच्या वास्तुशिल्पामागे तत्कालीन अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त विचार होता, याचा ठोस पुरावा नुकताच समोर आला आहे. रायगडावर सुरू असलेल्या पुरातत्त्वीय उत्खननात ‘यंत्रराज’ म्हणून ओळखले जाणारे प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण सौम्ययंत्र (Astrolabe) सापडले आहे. या यंत्राच्या शोधामुळे रायगडाच्या बांधकामात खगोलशास्त्राचा वापर झाल्याचा महत्वपूर्ण संकेत मिळाला आहे.

या उत्खननाचे कार्य भारतीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मागील काही वर्षांपासून सुरू आहे. विशेषतः कुशावर्त तलावाच्या वरील भागात आणि पर्जन्यमापक व वाडेश्वर मंदिराच्या दरम्यानच्या भागात हे उत्खनन करण्यात आले. त्यावेळीच हे प्राचीन यंत्र आढळून आले.

सौम्ययंत्र हे प्राचीन काळात ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास, दिशांचे निर्धारण आणि वेळ मोजण्यासाठी वापरले जाणारे एक अत्यंत महत्वाचे साधन आहे. या यंत्रावर कोरलेल्या अक्षरांमध्ये ‘मुख’ आणि ‘पूंछ’ यांचा उल्लेख असून, मध्यभागी साप किंवा कासवासारखी आकृती कोरलेली आहे. यामुळे उत्तर-दक्षिण दिशांचा अंदाज घेणे शक्य व्हायचे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

या उपकरणाच्या शोधामुळे रायगड किल्ल्याच्या बांधणीसाठी केवळ स्थापत्यशास्त्रच नव्हे, तर खगोलशास्त्राचाही वापर झाल्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. इतिहास संशोधकांसाठी आणि पुरातत्त्व अभ्यासकांसाठी हा एक महत्त्वाचा ठेवा ठरणार आहे.

रायगडावरील हे उत्खनन रोपवे अप्पर स्टेशनच्या मागील भागापासून ते कुशावर्त तलाव आणि जगदीश्वर मंदिर परिसरात विविध ठिकाणी राबविण्यात आले आहे. यामध्ये अनेक शिवकालीन वाड्यांचे अवशेषही आढळले असून, संपूर्ण उत्खननातून रायगडाच्या इतिहासाचा नवा पैलू समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top