बहु पैलू नाटककार – डॉ. र. म. शेजवलकर
ठाण्याच्या नाट्य परंपरेतील एक वेगळं नाव म्हणजे डॉ. रमाकांत शेजवलकर. व्यवसायाने दंतवैद्य असलेल्या शेजवलकरांनी नाटककार आणि कादंबरीकार म्हणून लक्षणीय कामगिरी बजावली होती. ठाण्यातील विविध हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी आपली ‘ राजा जो जो रे ‘ , ‘ आली आली ही राधाबाई ‘ , ‘ ऐकतील पैलतीर ‘ अशी वेगवेगळ्या प्रकृतीची नाटके लिहिली. ‘ पळता भुई थोडी ‘ हा त्यांचा फार्स आय. एन. टी. या नामवंत संस्थेनं व्यावसायिक रंगभूमीवर आणला होता. दूरदर्शनवरील
‘ गजरा’ साठी त्यांनी लिहिलेल्या संहिता लोकप्रिय झाल्या होत्या.राज्य स्तरावरील तमाशा लेखन स्पर्धेत त्यांनी लोकनाट्य लिहून सातत्याने पारितोषिके मिळवली. आकाशवाणीवर आंबट गोड या मालिकेचे अनेक भाग त्यांनी लिहिले होते. ‘ रमंथ ‘ हा काव्यसंग्रह, ‘ वळचणीचं पाणी ‘ , ‘ चुपके चुपके ‘ , बिझनेस मॅरेज ‘ या कादंबऱ्या अशी त्यांची साहित्य संपदा आहे. ठाणे महापालिकेने लेखनासाठी त्यांना ‘ ठाणे गौरव ‘ सन्मानाने गौरविले होते. त्यांच्या निधनामुळे ठाण्यातील साहित्य वर्तुळातील एक जाणकार व्यक्तिमत्त्व हरपले आहे.
