नुतनीकरणाविषयी कलाकार आणि निर्माते यांनी व्यक्त केले समाधान रंगायतन लवकरच होणार रसिकांसाठी खुले

राम गणेश गडकरी रंगायतनच्या नुतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

       ठाणे :- ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहाच्या वास्तूचे नूतनीकरण आता अंतिम टप्प्यात आहे. लवकरच रसिकांसाठी रंगायतन खुले होणार आहे. त्यापूर्वी, पूर्ण होत आलेल्या कामांची पाहणी बुधवारी ज्येष्ठ कलाकार, निर्माते आणि पदाधिकारी यांनी केली. नुतनीकरणाच्या झालेल्या कामाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले असून लवकरात लवकर या रंगमंचावर प्रयोग करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

      ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्यासह, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक अशोक हांडे, निर्माते दिलीप जाधव, निर्माते प्रसाद कांबळी यांच्यासह ठाण्यातील नाट्यकर्मी अभिनेते आणि दिग्दर्शक मंगेश देसाई, दिग्दर्शक विजू माने यांनी रंगायतनची पाहणी केली. त्यावेळी, उपायुक्त उमेश बिरारी, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी उपस्थित होते. 

   गडकरी रंगायतनमध्ये रंगमंच, आसन व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, रंगपट, स्टेजच्या मागची बाजू, सेट आणण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे यांच्या कामांची पाहणी यावेळी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांच्यासाठी लिफ्टची व्यवस्था करण्याचा निर्णय स्तुत्य आहेच. त्यासोबत, रंगायतनच्या तळमजल्यावर नाटकासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आसनव्यवस्थाही करावी, अशी सूचना आजच्या पाहणीत करण्यात आली. तसेच, पार्किंग व्यवस्था, तालीम हॉल, तिकिट खिडकी, नाटकांचे फलक लावण्यासाठी असलेली जागा यांचीही पाहणी केली. 

 गडकरी रंगायतनच्या नुतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. जुन्या वास्तूला असलेल्या मर्यादा सांभाळून शक्य तेवढ्या जास्तीच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आज झालेल्या पाहणीच्या वेळी कलाकार, निर्माते यांनी केलेल्या सूचनांचीही महापालिकेने नोंद घेतली आहे. त्यावर तत्काळ कार्यवाही करून लवकरात लवकर रंगायतन नाट्यरसिकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी स्पष्ट केले. 

गडकरी रंगायतनच्या कामाची आज पुन्हा पाहणी केली. काम चांगले झाले आहे. ध्वनी आणि प्रकाश योजनाही व्यवस्थित आहे. रंगपट आणि बॅक स्टेजला काही सुधारणा सुचवल्या आहेत. आता लवकरात लवकर या रंगमंचावर प्रयोग करण्याची संधी मिळू देत.

– प्रशांत दामले, अध्यक्ष अ. भा. मराठी नाट्य परिषद

प्रकाशयोजनेबद्दल काही सूचना आजच्या पाहणीत केल्या आहेत. नुतनीकरणाचे उर्वरीत काम चांगले झाले आहे. वास्तू आकर्षक झाली आहे. त्यात आता प्रयोगाचे रंग लवकर भरले जावेत.

– अशोक हांडे, ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक

पहिल्या पाहणीच्या वेळी केलेल्या सूचनांची व्यवस्थित अमलबजावणी झाल्याचे पाहून चांगले वाटले. नुतनीकरणाचे काम योग्य पद्धतीने झाले आहे. ज्या काही एक-दोन गोष्टी होत्या त्याही आजच्या पाहणीनंतर पूर्ण करण्याचा शब्द महापालिकेने दिला आहे.

– प्रसाद कांबळी, निर्माते

गडकरी रंगायतनला आज भेट दिल्यावर आनंद वाटला. नुतनीकरणासाठी थोडा वेळ लागला असला तरी ते काम चांगले झाले आहे. रंगमंचापासून ते आसनव्यवस्थेपर्यंत सगळ्या गोष्टी चांगल्या जुळून आल्या आहेत.

– मंगेश देसाई, अभिनेते आणि निर्माते

ठाणे शहराची ओळख असलेली ही वास्तू चांगली होण्यासाठी उत्तम काम झाले आहे. सूचनांची अमलबजावणी झालेली आहे. या वास्तूचे वेगळेपण अधोरेखित करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्वजणांचे मनापासून कौतुक आहे.

– विजू माने, दिग्दर्शक आणि निर्माते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top