ठाण्यातील रेमंड संकुलातहीघुमणार ‘ढाक्कुमाकुम’चा सूर

युवा स्टार प्रतिष्ठानचे आयोजन, दहा थरांसाठी ११ लाखांचे बक्षीस, अंध गोविंदा पथकाचाही सहभाग

ठाणे : गोविंदां'चीपंढरी’ मानल्या जाणाऱ्या ठाणे शहरातील रेमंड रहिवाशी संकुलातही यंदा प्रथमच ‘ढाक्कुमाकुम’चा सूर घुमणार आहे. `युवा स्टार प्रतिष्ठान’चे अध्यक्ष तुकाराम आंब्रे, टेन एक्स हॅबिटॅट, खेड तालुका रहिवाशी संघ आणि प्रभाग क्र. ७ मधील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सव भरविण्यात येणार आहे. दहा थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला ११ लाख रुपयांचे, तर रेमंड संकुलात सर्वप्रथम ९ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला ३ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. या उत्सवाचे अंध मुलांकडून रचली जाणारी पाच थरांची सलामी हे वैशिष्ट्य असेल. तर सात थर रचणाऱ्या महिला पथकाला एक लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

युवा स्टार प्रतिष्ठान'चे अध्यक्ष तुकाराम आंब्रे यांनी पत्रकार परिषदेत आज ही माहिती दिली. रेमंड रहिवाशी संकुलात मोठ्या संख्येने नागरिक राहण्यासाठी आले आहेत. या भागातील नागरिकांसाठी सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक आदी विविध उपक्रमयुवा स्टार प्रतिष्ठान’तर्फे राबविण्यात येणार आहेत. त्यानुसार यंदा प्रथमच दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात मुंबईतील नयन फाऊंडेशनच्या ८० अंध गोविंदांकडून पाच थरांची सलामी दिली जाईल. त्याचबरोबर अभिनेत्री भाग्यश्री चिरमुले यांच्यासह विविध कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाईल. तर स्थानिक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, मुलांचा फॅशन शो आदी कार्यक्रमही आयोजित केले आहेत.
मुंबई शहर, ठाणे आणि महिलांसाठी अशा तीन स्वतंत्र हंड्या बांधल्या जातील. या उत्सवात दहा थर रचणाऱ्या पथकाला ११ लाख रुपयांचे बक्षीस व चषक दिला जाईल. तर सर्वप्रथम ९ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला ३ लाख रुपयांचे बक्षीस व चषक दिला जाईल. त्यानंतर नऊ थर रचणाऱ्या पथकाला १ लाख रुपये दिले जातील. पुरुष गटातील ८ थरांसाठी २५ हजार रुपये, ७ थरांसाठी १० हजार, ६ थरांसाठी ६ हजार आणि ५ थरांसाठी ३ हजारांचे, महिला गटात ७ थरांसाठी १ लाख ११ हजार १११ रुपये, ६ थरांसाठी १५ हजार आणि ५ थरांसाठी १० हजार रुपये बक्षीस दिले जाईल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी मंत्री रामदास कदम, श्रीमती लताताई शिंदे, खासदार नरेश म्हस्के, शिवसेना महिला सेनेच्या विधानसभा प्रमुख परिषाताई सरनाईक, शिवसेना उपनेते निलेश सांबरे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, युवासेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उत्सवाला उपस्थित राहून गोविंदा पथकांना प्रोत्साहन देणार आहेत.
या उत्सवाच्या यशस्विततेसाठी अध्यक्ष तुकाराम आंब्रे यांच्याबरोबर पप्पू कदम, मंडळाचे खजिनदार परशुराम आंब्रे, संतोष मोरे, परशुराम साबळे, राहुल सादरे, प्रताप सुर्वे, राजेंद्र कुंभारे, रुक्मिणी त्रिवेदी, सागर कड, निखिल केरकर, विजय नागावकर, अमरीश कल्लू, अरुण नायर, संजय सुर्वे, निलेश काकडे, मनिष कोलते, अभिजित साजेकर, महेश कायस्थ, स्वाती कदम आदी कार्य करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top