ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख येथील खड्डे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बुजवणार

रस्त्यावर पाणी साचू नये यासाठीही करणार उपाययोजना

लवकरात लवकर हा मार्ग खड्डेमुक्त करण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली रस्ते कामांची पाहणी

ठाणे : – ठाणे शहरातील घोडबंदर मार्गावरील गायमुख येथील रस्त्याला पडलेले खड्डे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बुजवण्यात येतील असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. घोडबंदर रोडवरील
खड्डे पडलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीत दिले होते. त्यानंतर आज त्यांनी स्वतः गायमुख येथे सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती कामाला भेट देऊन त्यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

घोडबंदर मार्गावरील गायमुख जवळ रस्त्याला मोठे खड्डे पडल्याने इथला प्रवास हा धोकादायक बनला होता. प्रचंड वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागत असल्याने वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. पालकमंत्री म्हणून याबाबत
शिंदे यांना वारंवार याबाबत तक्रारी येत होत्या. त्यानंतर त्यांनी याबाबत आढावा बैठक घेऊन याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच हा रस्ता तातडीने ब्लॉक घेऊन बुजवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याने हे काम सुरू केल्याचे समजताच त्यांनी प्रत्यक्ष गायमुख येथे भेट देऊन तिथे सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी खराब रस्त्याचा भाग पूर्णपणे काढून बेस काढून त्यानंतर इथे डब्लूबीएमने ग्राऊटिंग करावे, त्यानंतर त्यावर डांबर टाकून सगळ्यात शेवटी त्यावर मासटिंग करावे असे निर्देश दिले. जेणेकरून बनवलेले रस्ते दर्जेदार तर होतीलच पण अवजड वाहने जाऊन पुन्हा त्यावर खड्डे पडणार नाहीत. त्यासाठी काही दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला असून लवकरात लवकर या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

दर पावसाळ्यापूर्वी हे रस्ते दुरुस्त करूनही पुन्हा तिथे डागडुजी करण्याची वेळ येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र याठिकाणी आता ६० मीटर रुंदीचा नवीन रस्ता प्रस्तावित असून तो पूर्ण झाल्यावर हा प्रश्न राहणार नाही असे शिंदे यांनी सांगितले. हे काम सुरू करण्यासाठी वन विभाग आणि खाजगी मालकांकडून जमीन अधिग्रहित केली जात असून ते कामही लवकर पूर्ण केले जाईल. मात्र तुर्तास नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी इथे मासटिंगचा वापर करून रस्त्याची डागडुजी करण्यात येत असून, ते करताना इथे साचणारे पाणी साचू नये यासाठी चर देखील बांधण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले. जेणेकरून इथे साचणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा होईल आणि तयार केलेला रस्ता सुस्थितीत राहील असे शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच भविष्यात ठाणे – बोरीवली बोगदा मार्ग, साकेत ते फाऊंटन कोस्टल मार्ग तयार झाल्यानंतर या मार्गावरील ताण नक्की कमी होईल आणि वाहतूक कोंडीमधून नागरिकांना कायमचा दिलासा मिळेल असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top