7 वर्षीय ठाणेकर जलतरणपटू रेयांश खामकरची लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
ठाणे :- ठाण्यातील अवघ्या ७ वर्षांच्या रियांश सानिका दीपक खामकरने अरबी समुद्रात ३० किमी एकट्याने पोहून विश्वविक्रम प्रस्थापित केला. 15 नोव्हेंबर 2025 रोजी 7 तास 30 मिनिटे 11 सेकंदांत हे अंतर पोहून पूर्ण केलेल्या त्यांच्या पराक्रमाची नोंद लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. रियांश खामकरने ‘स्टारफिश स्पोटर्स फाऊंडेशनचे प्रशिक्षक कैलाश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे धडे घेत असून ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे नियमित सराव करीत आहे. रेयांशच्या या यशामुळे ठाणे महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे सत्काराप्रसंगी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले.
यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते गोवा येथे हवाई बीच ते हवाई वेल्हा बीच येथे 26 जानेवारी 2026 रोजी 10 कि.मी सागरी अंतर पार केलेले जलतरणपटू आयुषी आखाडे, सुयश हिंदळेकर, ध्रिती कोळी, समिप्ता व्हावळ, रेयांश खामकर, ओजस मोरे, गार्गी भरणुके, सिद्ध मुपेनेट्टी, विवान गुरसुळे, समर्थ भिलारे यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच जलतरणपटूंचे प्रशिक्षक कैलास आखाडे यांचाही सन्मान करण्यात आला
यापूर्वी रियांशने विजयदुर्ग येथील अरबी समुद्रात मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी हे 15 किलोमीटरचे आव्हानात्मक सागरी अंतर तीन तासात पोहून पार केले आहे. 15 कि.मीचे अंतर पार करणारा रेयांश खामकर हा सर्वात लहान जलतरणपटू ठरला आहे. त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्डने घेतली आहे.
रेयांश खामकर हा स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या माध्यमातून जलतरणाचे धडे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्याकडून घेतो. रेयांश ठाणे महापालिकेच्या मारोतराव शिंदे तरणतलाव येथे दररोज सराव करतो. रेयांश हा ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा विद्यार्थी आहे. गेल्या वर्षभरात विविध स्पर्धामध्ये रेयांशने 13 पदके प्राप्त केली आहेत, त्यात 5 सुवर्ण, 5 रौप्य व 3 कांस्य पदकांचा समावेश आहे.
2 जून 2024 मध्ये ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत 25 मीटर बटरफ्लाय विथ फिन्स स्पर्धेत त्याने सुवर्णपदक तर 50 मीटर फ्रीस्टाईल विथ फिन्समध्ये कांस्य पदक प्राप्त केले आहे. 6 जुलै 2024 रोजी कोल्हापूर येथे झालेल्या महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या त्रिराज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत त्याने 50 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे. 17 ते 18 ऑगस्ट 2024 रोजी बँकॉक, थायलंड येथे झालेल्या आशियाई ओपन स्कूल्स स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये रेयांशने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तो महाराष्ट्र एक्वाटिक असोसिएशनने निवडलेल्या 15 जलतरणपटूंपैकी एक असून, त्याने आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. 6 वर्षांखालील मुलांच्या गटात 25 मीटर फ्रीस्टाइल किकबोर्डमध्ये रौप्य पदक, 25 मीटर फ्री स्टाईलमध्ये कांस्य पदक, 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये कांस्य पदक, 200मीटर फ्री स्टाईल रिलेमध्ये रौप्य पदक प्राप्त केले आहे.
15 सप्टेंबर 2024 मध्ये अंडरवॉटर स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र द्वारा आयोजित केलेल्या चौथ्या महाराष्ट्र राज्य फिन स्विमिंग स्पर्धेत रेयांशने 50 मीटर मोनोफिन सरफेस स्विमिंगमध्ये सुवर्णपदक, 100 मीटर बायफिन मिश्र रिलेमध्ये सुवर्णपदक, 50 मीटर बायफिन स्विमिंगमध्ये रौप्यपदक पटकाविले. सदरची स्पर्धा ही 8 वर्षे व त्यावरील वयोगटासाठी होती, परंतु रेयांशने आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत केलेली कामगिरी लक्षात घेऊन 9 वर्षे या वरिष्ठ वयोगटात सहभागी होण्यासाठी त्याला विशेष प्रवेश देण्यात आला होता, ज्यामध्ये त्याने 9 वर्षांखालील जलतरणपटूंशी स्पर्धा केली.
9ऑक्टोबर 2024 रोजी विबग्योर हायस्कूल खारघर येथे झालेल्या 16 व्या व्हिवा इंटरस्कूल जलतरण स्पर्धेत रेयांशने 20 मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्णपदक आणि 20 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य पदक प्राप्त केले.

