ठाणे, 30 जुलै.(प्रतिनिधी): शहरी नक्षलवादाच्या नावाखाली राज्य सरकारने जनसुरक्षा कायदा बहुमताच्या जोरावर संमत केलेला आहे. या कायद्यामधील तरतुदी लोकशाही प्रणालीच्या विरुद्ध आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याची व नागरि हक्कांची पायमल्ली होणार आहे, याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ठाणे काँग्रेस च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निदर्शने करत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी हा कायदा मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
विधिमंडळात चर्चा टाळून, फक्त बहुमताच्या बळावर सरकारने हा कायदा मंजूर केला आहे. या कायद्यानुसार सरकारला कोणतेही सामाजिक आंदोलन देशविरोधी ठरवून कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्याचे अधिकार मिळतात. सामाजिक आंदोलनांचा गळा घोटण्यासाठी सरकार या कायद्याचा वापर करणार असल्याची शक्यता ठाणे काँग्रेस चे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की जनतेचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा, सामाजिक आंदोलनांचा गळा घोटणारा हा कायदा असून सरकारचा डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही.
याप्रसंगी ठाणे काँग्रेस चे अध्यक्ष विक्रांत चव्हाण,मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे,भालचंद्र महाडिक,महेंद्र म्हात्रे,हिंदुराव गळवे,निशिकांत कोळी,रमेश इंदीसे, रवींद्र कोळी,स्मिता वैती,शिल्पा सोनोने,शीतल अहेर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
