ठाणे : ‘ठाणे’ नशेच्या विळख्यात अडकत चालले आहे. शाळा – महाविद्यालयांच्या आसपास असलेल्या पान टपऱ्यांमधून ई-सिगारेट, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांसह ड्रग्जची विक्री होत असून ड्रग्ज तस्करांचा वावर शाळांच्या परिसरात वाढला आहे. यामुळे युवावर्गासह शाळकरी विद्यार्थी राजरोसपणे अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन अख्खी पिढी नशेच्या विळख्यात बर्बाद होत आहे. तेव्हा, तरुण पिढीला नशेच्या विळख्यात अडकविण्यासाठी ड्रग्सचे रॅकेट चालविणाऱ्या आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी तसेच, राजकिय आणि सामाजिक घटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरीकांकडुन होत आहे.
ठाणे परिसरात अंमलीपदार्थ, दारू, अफु, चरस, गांजा, एमडी पावडर, सिगारेट, तंबाखु, ड्रग्स आणि विविध नशेचे तत्सम पदार्थ खुलेआम तर काही लपून छपून बेकायदेशीररीत्या उपलब्ध होत आहेत. ठाण्यासह कळवा, दिवा आणि विशेषतः मुंब्रा परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या या नशेच्या विविध पदार्थामुळे तरुणपिढी अंमली पदार्थाच्या आणि नशेच्या विळख्यात अडकले आहेत. शिवाय यासोबतच सेक्स रॅकेट सारखे मानवी तस्करीचे प्रकारही वाढीस लागत आहेत.
तस्कर विद्यार्थ्याना ड्रग्ज पुरवत असून अभ्यासू विद्यार्थीही ड्रग्जकडे वळू लागली आहेत.पानटपरीवर मिळणारी नशेची गोळी सेवन करून विद्यार्थी शाळेत येतात. शाळेतही विद्यार्थी नशेत असतात. विद्यार्थ्याच्या दप्तरांमध्ये नशेच्या गोळ्या, गुटख्याच्या पुड्या, सिगारेट आढळत आहेत. शाळेपासून काही अंतरावर असलेल्या पानटपऱ्यांमधून ई-सिगारेटची देखील विक्री होते. शाळकरी मुलांकडे ई-सिगारेट आढळून आल्या होत्या. ही गंभीर बाब ठाणे शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत पानटपऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. मध्यंतरी, ठाणे महापालिकेच्या महासभेतही अंमली पदार्था विरोधात कसुन कारवाई व्हावी, याकरिता ठराव देखील करण्यात आला होता. पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रमाणे ड्रग्स तस्करांना रान मोकळे झाले आहे. तेव्हा, नशेचा विळखा दूर करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने प्रयत्न करणे आवश्यक असुन विशेषतः पोलीसांनी याकामी कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
