ठाणे :- कोकण ग्राम विकास मंडळाच्या वतीने भाजप नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकारातून ठाण्यात सुरू असलेल्या भव्य मालवणी महोत्सवात खाद्य संस्कृतीच्या सुगंधासोबत साहित्य संस्कृतीचाही दरवळ अनुभवायला मिळाला. मालवणी महोत्सवात लेखिका संध्या सामंत – सावंत यांच्या “छोट्यांच्या मोठया विश्वात…चला जाऊया” या बाल साहित्यकृतीचे प्रकाशन उत्साहात पार पडले. बाल साहित्यिका डॉ. सुमन नवलकर आणि नगरसेवक सीताराम राणे यांच्या शुभहस्ते पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.
ठाण्याच्या शिवाईनगर, उन्नती गार्डन मैदानातील स्व. अजितदादा पवार महोत्सव नगरीत मालवणी महोत्सव सुरू आहे. दररोज खवय्यांसह रसिक आणि भाविकांची सांस्कृतिक भूक भागवली जात आहे.यंदा प्रथमच उभारलेल्या स्व. मंगेश पाडगावकर कलादालनात साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (ता.१२ फेब्रु.) “छोट्यांच्या मोठया विश्वात…चला जाऊया” या बाल साहित्यकृतीचे प्रकाशन संपन्न झाले. या प्रसंगी, व्यासपीठावर साहित्यिका प्रज्ञा पंडीत, बाल साहित्यप्रेमी राजेंद्र गोसावी, प्रा. संतोष राणे, हेमंत पात्रे, समाजसेवक संतोष बाजी राणे, मनिष वाघ व अनेक नवोदित कवी उपस्थित होते. पुस्तकाचा आढावा घेताना बाल साहित्यिका डॉ. सुमन नवलकर यांनी, पुस्तकातील प्रत्येक कथेच्या प्रारंभी केलेले निसर्गवर्णन विशेष उल्लेखनीय असल्याचे सांगितले. “निसर्गाच्या जितके जवळ जाल, तितके त्याच्याशी एकरूप व्हाल. प्राणी-पक्ष्यांचे विश्व निसर्गाशी घट्ट निगडीत आहे. त्यामुळे निसर्गाचे संवर्धन आणि जपणूक करणे आपली जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले. आजकाल मेट्रो-मोनो प्रकल्पांच्या नावाखाली होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडीविरोधात आवाज उठवण्याचे एक प्रकारचे धाडस या माध्यमातुन लेखिकेने दाखवले आहे. तेव्हा, अशा पुस्तकातुन प्रेरणा घेऊन सर्वानीच पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रा. रुपेश महाडीक यांनी आपल्या मनोगतात, आजची पिढी निसर्गापासून दूर जाऊन मोबाईलच्या आहारी जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. “निसर्गाचा अव्हेर करून हातात मोबाईल घेतले जात आहेत. मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि जिज्ञासेला चालना देण्यासाठी अशा कल्पनेपलीकडील १४ बालकथा असलेली पुस्तके वाचावयास द्यायला हवीत. निसर्गाशी समतोल राखणारे बालसाहित्य निर्माण होणे काळाची गरज आहे,” असे ते म्हणाले. नगरसेवक सीताराम राणे यांनी, बालपणी आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी झाली, याचे भावनिक वर्णन केले. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत घड्याळाच्या काट्यावर धावणारे पालक आपल्या पाल्यांकडे दुर्लक्ष करत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मुलांना वेळ देणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ह्या कार्यक्रमात कौस्तुभ सुतार या बाल चित्रकाराने व्यासपीठावरील मान्यवरांची हुबेहुब रेखाचित्रे काढून सर्वांची दाद मिळवली. त्याच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल आयोजकांनी त्याचा हृदयस्पर्शी सत्कार केला.संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन मनिष पंडीत यांनी प्रभावीपणे केले.
मालवणी महोत्सवातील साहित्य संमेलनाचा हा कार्यक्रम झणझणीत खाद्य परंपरेइतकाच साहित्यिक जाणिवांचा उत्सव ठरला. बाल साहित्याच्या माध्यमातून निसर्ग, संस्कार आणि कुटुंबमूल्यांचा संदेश देण्यात आला.
प्रतिक्रिया :
मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ कमी करून त्यांना ‘ग्रीन टाइम’ द्यावा, असा संदेश दिला. “मुलांना स्क्रीनची नाही, तर ‘सन’स्क्रीनची गरज आहे. तंत्रज्ञानाला विरोध नाही; बदल ही काळाची गरज आहे. मात्र, बदल स्वीकारताना काही मूलभूत मूल्ये सोडून चालणार नाहीत. लहान मुलांच्या बाबतीत तर अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे. निसर्गाचा सहवास आणि कुटुंबवत्सलता हीच खरी जीवनशिक्षणाची गुरुकिल्ली आहे,” असे त्यांनी नमूद केले.
- संध्या सामंत – सावंत, पुस्तकाच्या लेखिका. चौकट – मालवणी महोत्सवात शब्दफुलांचा ‘बहर’ मालवणी महोत्सवातील स्व. मंगेश पाडगावकर कलादालनात आयोजित साहित्य संमेलनात गुरुवारी नवोदित कवींचे काव्य संमेलन उत्साहात पार पडले. आनंद रांजणे, अस्मिता चौधरी, मीनल कांबळे, कौस्तुभ शैलेश गोसावी, आदिती अभिजीत भाट, अनिल महेंद्र गमरे, गौरी अनिकेत धबडे, परेश प्रकाश दळवी, आनंद लेले आणि अमेय नागावकर (मुंबई) या नवकवींनी आपल्या कवितांमधून विविध सामाजिक, भावनिक आणि समकालीन विषयांना स्पर्श केला. या काव्य वाचनाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाची रंगत वाढवली. आयोजक सीताराम राणे यांच्या अशा उपक्रमांमुळे नवोदित कवी आणि साहित्यिकांना व्यासपीठ मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

