ठाणे : घोडबंदर मार्गावर बुधवारी सकाळी उशीरापर्यंत सुरु असलेल्या मेट्रोच्या कामाचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर बसला. सकाळपासून येथील पातलीपाडा ते कासारवडवली या दोन्ही मार्गिकांवर वाहतुक कोंडी झाली आहे. त्यामुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले. सकाळी शाळेच्या बसगाड्या देखील वाहतुक करत होत्या. त्यामुळे शाळेच्या बसगाड्यांनी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही कोंडीचा त्रास सहन करावा लागला.
घोडबंदर मार्गावर वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरु आहे. बुधवारी सकाळी येथील पातलीपाडा भागात मेट्रो मार्गिकेसाठी गर्डर उभारले जात होते. परंतु या कामास सकाळी ६,१५ वाजले. याच कालावधीत घोडबंदर मार्गावर वाहतुकीचा भार अधिक झाला. त्यामुळे या मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली.
दोन्ही मार्गिकांवर पातलीपाडा ते कासारवडवली पर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. वाहन चालकांना अवघ्या काही मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी अर्धा तास लागला. शाळा सुरु झाल्याने मार्गावर शाळेच्या बसगाड्यांची वाहतुक वाढली. त्यामुळे विद्यार्थी देखील या वाहतुक कोंडीत अडकून होते. शाळकरी मुलांना, नोकरदारांना या वाहतुक कोंडीमुळे वेळेत पोहचता आले नाही. सकाळी ८ नंतरही वाहतुक कोंडी कायम होती. काही वाहन चालकांनी अंतर्गत मार्गांचा वापर करण्यास सुरुवात केली. परंतु अंतर्गत मार्गावर देखील वाहनांचा भार वाढून कोंडी झाली होती.