ठाणे :- समता विचार प्रसारक संस्थेचे संस्थापक व कामगार नेते बिरपाल भाल यांची नात आदिती सुजीत भाल सफाई कामगार वसाहतीत राहून यंदा एसएससी परिक्षेत ६०% गूण मिळवून यशस्वी झाली. तिचे वडील बॅाटल्ड पाण्याचा व फेरीवाल्याचा व्यवसाय करतात तर आई ब्युटी पार्लर चालवते.
आज लागलेल्या दहावी एसएससी निकालात ठाण्यातल्या लोकवस्तीत व परिसरातील ग्रामीण विभागातील एकलव्य विद्यार्थ्यांनी घरातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून घवघवीत यश मिळवण्याची परंपरा कायम ठेवली आहे, असे समता विचार प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी सांगितले. यंदा संस्थेच्या एकलव्य गौरव उपक्रमाचे ३३ वे वर्ष आहे.
निजामुद्दीन शेख – ९१%.
वडील रिक्षा चालवतात. आई घरी असते. राबोडी फ्रेंड्स सर्कलच्या शाळेतील या विद्यार्थ्याला संस्थेच्या १० वी मार्गदर्शन शिबिराचा फायदा झाला होता.
यंदा उत्तीर्ण काही एकलव्या विद्यार्थ्यांची हकीगत पुढील प्रमाणे आहे.
अर्चना शहाजी हिरवे – ९०%
काल्हेर वरुन रोज मो ह विद्यालयात यायची. वडील रीक्षा चालवून घर चालवतात. १० वी ला क्लास लावला नव्हता. अशा परिस्थितीत तिची मोठी बहीणही इंजिनियरींग करते आहे.
समर्थ रणजीतकुमार – ७८ %
वडील ड्रायव्हर आहेत. आई शाळेत शिपाई आहे. समर्थ १० वी ला स्वतः नोकरी करून ठाणे महापालिकेच्या मानपाडा माध्यमिक शाळेत शिकत होता. सुटीत संस्थेच्या शिबिरात व वंचितांचा रंगमंच नाट्य जल्लोष मधे सहभागी झाला होता.
निखिल फकीरा कांबळे – ६४%
वडील रिक्षा चालवतात. कुटुंब मोठे. न्यू इंग्लिश शाळेत शिकणाऱ्या निखिलने १०वीला क्लास लावला नव्हता. संस्थेच्या सुटीतील शिबिरात निखिल सहभागी होता.
सेजल रमेश माटे – ९०%
वडिलांचं अर्धांगवायुमुळे ३ वर्षांपूर्वी निधन. आई ग्रॅज्युएट. मुंबई महापालिकेत शिपाई म्हणून नोकरी करून घर चालवते.
सुरेखा बाबुराव पिंगळे – ६९%.
आई लोकांकडे धुणी भांडी – घरकाम करते. वडील ड्रायव्हर आहेत. १० वीला असतांना सुरेखा स्वतः नोकरी करायची. सुटीत संस्थेच्या शिबिरात व वंचितांचा रंगमंच नाट्य जल्लोष मधे सहभागी झाली होती.
सोनी दिलीप शहा – ७५%
आई वडील वस्तीत छोटं दुकान चालवतात. घरात माणसे जास्त व उत्पन्न अपुरे. सोनीने १० वीला क्लास लावला नव्हता.
दिक्षा बंडू तिडके – ५७%
वडील हयात नाहीत. आई लोकांकडे धुणी – भांडी घरकाम करते. दिक्षा ठाणे महापालिका सावरकर नगर माध्यमिक शाळेत शिकत असतांना स्वतः कंपनीत काम करायची.
जान्हवी मधुकर पाटील – ७३%
काल्हेर जवळच्या केवणी गावातून रोज मो ह विद्यालयात यायची. वडिलांचं अकाली निधन. मोठी बहीण टेलरींगचा व्यवसाय करून घर चालवते.
रिहान फिरोझ पठाण – ४७%
घरात कुणीही शिकलेले नाही. रिहान हा घरात पहिला एसएससी. वडील ट्रक ड्रायव्हर. आई घरातच असते. घर वस्तीत. ठाणे महापालिकेच्या मानपाडा माध्यमिक शाळेचा विद्यार्थी.
हर्ष गणेश भागणे – ६३%
आई लोकांकडे धुणी भांडी – घरकाम करते. वडील मंदीरात काम करतात. ठाणे महापालिका किसन नगर माध्यमिक शाळेचा विद्यार्थी. हर्षने १०वीला क्लास लावला नव्हता.
चैताली वसंत मुकादम – ७३ %
भिवंडी जवळच्या माणकोलीहून रोज मो ह विद्यालयात यायची. वडिलांचं २ वर्षांपूर्वी निधन. आई टेलरींगचे काम करून घर चालवते. १० वीला क्लास लावला नव्हता.
कुणाल विजय पाटील – ७७%
वडिलांची कंपनी बंद. सध्या घरीच असतात. आई मुक बधीर शाळेत शिपाई काम करून घर चालवते.
पुढील महिन्यात एकलव्य गौरव कार्यक्रम
या व यंदा यश मिळवलेल्या अन्य एकलव्य विद्यार्थ्यांना एकलव्य गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम पुढील महिन्यात घेण्यात येईल, अशी माहिती संस्थेच्या विश्वस्त लतिका सु मो यांनी दिली. २१ व्या शतकातल्या २५ व्या वर्षातही १० वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुली – मुलांना किमान सुविधा सरकार पुरवू शकत नाहीत, ही आपल्या व्यवस्थेची विदारक स्थिती आहे. ती बदलण्याचा संघर्ष तीव्र करणें आवश्यक आहे, असे प्रथम एकलव्य व असंघटीत कामगारांचे नेते जगदीश खैरालिया यांनी सांगितले.