ठाणे :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी आवाहन केल्याप्रमाणे ‘क्षयरोगमुक्त भारत’ मोहिमेअंतर्गत ‘क्षयरोगमुक्त ठाणे’ साठी ठाणे महापालिकेबरोबर रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे. क्षयरोग झालेल्या व्यक्तीला औषधोपचारासोबत पोषक आहाराची देखील गरज असते हे ध्यानात ठेऊन महापालिकेने ‘नि-क्षय मित्र’ नावाने कुटुंबियांना महिन्याचे रेशन पोषक आहार मोफत देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास पालिकेतर्फे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतना नितील के , क्षयरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रसाद पाटील, रोटरी क्लब ठाणे नॉर्थ अध्यक्षा मेधा जोशी उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रिमियमच्या अध्यक्षा डॉ. सोनल बागडे, रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटीचे अध्यक्ष जगदीश चेलारामानी यांचे सहकार्य कार्यक्रमाला लाभले. तर डॉ. लकी कासाट व डॉ. सुप्रिया या नवदांपत्याने तसेच डॉ.मोहन चंदावरकर आदीनी नि-क्षय मित्रसाठी योगदान दिले. यावेळी १०० कुटुंबाना नि-क्षय मित्र किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रसाद पाटील यानी केले.