कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनच्या माध्यमातून 689 जणांची कर्करोग तपासणी झोपडपट्टी विभागातील नागरिकांनी केली तपासणी

ठाणे :- असंसर्गजन्य व्याधीमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेवून ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात 2 ते 6 मे या कालावधीत कॅन्सर डायग्नोस्ट‍िक व्हॅनमार्फत झोपडपट्टी विभागात राहणाऱ्या नागरिकांची मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करण्यात आली. यात 30 वर्षावरील महिला व पुरूषांची तपासणी करण्यात आली असून 320 जणांनी मुख कर्करोग तपासणी, 186 जणांनी स्तन कर्ककरोग तपासणी, 183 जणांनी गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करुन घेतली. एकूण 689 नागरिकांनी या तपासणीचा लाभ घेतला.

         ४ फेब्रुवारी या जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी कॅन्सर डायग्नॉस्टिक व्हॅनचे उ‌द्घाटन मुंबईत केले होते. ही व्हॅन संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार असून 2 मे ते 6 मे या कालावधीत ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात या व्हॅनमार्फत तपासणीचा दौरा आयोजित करण्यात आला होता.  2 मे रोजी  रोझा गार्डनिया, नागरी प्रार्थामक आरोग्य केंद्रात या व्हॅनचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या हस्ते, उपआयुक्त (आरोग्य), ठाणे महानगरपालिका श्रो. उमेश बिरारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चेतना नितिल के. व माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. वर्षा हेमंत ससाणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

           ही व्हॅन कर्करोगाची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांनी सुसज्ज असून यामध्ये मुख कर्करोगाच्या तपासणीसाठी डेंटल चेअर व बायप्सी घेण्यासाठीची आवश्यक उपकरणे तसेच गर्भाशय मुख कर्करोगाच्या तपासणीसाठो Pap smear व VIA तपासणी तसेच स्तन कर्करोग बायोप्सी साठी आवश्यक असलेले उपकरणे उपलब्ध आहेत.

        झोपडपट्टी सदृश्श भागात राहणारे नागरिक जे त्यांच्या उच्च तपासणीसाठी रुग्णालयांपर्यंत पोहोचू शकत नाही अशा लोकांना या सुसज्ज व्हॅन द्वारे सेवा देण्यात यावी हा या कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनचा मुख्य उद्देश आहे. ही व्हॅन प्रथम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र रोझा गाडेनिया, सी आर वाडीया, किसन नगर असा दौरा करत अखेरीस लोकमान्य कोरस या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आली.

        या व्हॅनमार्फत तपासणी करण्यात आलेल्या महिलांपैकी १३१ महिलांची Pap smear तपासणी व ३९ महिलांची VIA तपासणी करण्यात आली. तसेच ०७ पुरूष व ०१ महिलेची मुख कर्करोगाच्या निदानाकरीता Biopsy करण्यात आली. सदर तपासणीत ०३ पुरूष व १० महिला या संशयीत रूग्णांना नजिकच्या रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले असून  त्यांना देण्यात येणाऱ्या उपचारांचा पाठपुरावा संबंधित नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत करण्यात येईल असे माता बालसंगोपन अधिकारी डॉ. वर्षा ससाणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top