भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये, असे शौर्य दाखवले म्हणून..;
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
ठाणे :- पाकिस्तानने आपल्या भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये, अशाप्रकारेचे शौर्य आपल्या तिन्ही दलाच्या सैन्याने दाखवले आणि त्यांच्या पाठीशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उभे राहिले, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाण्यात तिरंगा रॅलीदरम्यान बोलताना व्यक्त केले.
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. यात २६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर ७ मे रोजी पहाटे भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या परिसरातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर सर्वच सस्तरातून भारतीय लष्करावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशाचप्रकारे भारत मातेच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या सर्व शूरवीर सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेने तर्फे बुधवारी ठाण्यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय विश्राम गृह येथून ही रॅली सुरू झाली. या रॅलीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे सहभागी झाले होते. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,खासदार नरेश म्हस्के,
माजी आमदार रवी फाटक,शिवसेना राज्य सचिव राम रेपाळे,महिला आघाडी जिल्हा प्रमुख मिनाक्षी शिंदे,शहर प्रमुख हेमंत पवार,महिला आघाडी, युवासैनिक तसेच इतर मान्यवर माजी नगरसेवक, विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रॅलीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित प्रसार माध्यमांशी संवाद साधत ही रॅली काढण्यामागचे कारण स्पष्ट केले.
पहलगाम हल्ल्यानंतर दहशवाद्याना जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. तसेच लष्कराने दिलेल्या प्रतिउत्तरानंतर गेल्या दोन दिवसांत पाकिस्तानची काय असवस्था झाली, हे संपूर्ण देशाने पाहिले. पाकिस्तानने आपल्या भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये, अशाप्रकारेचे शौर्य आपल्या तिन्ही दलाच्या सैन्याने दाखवले आणि त्यांच्या पाठीशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उभे राहिले. यामुळेच तिन्ही सैन्य दलाचे अभिनंदन करण्याबरोबरच त्यांच्या पाठीशी देश खंबीरपणे उभे असल्याचे दाखवून देण्यासाठी ही रॅली काढल्याचे शिंदे म्हणाले.