ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत आयोजित ‘यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२५’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायत राज संस्थांना तसेच गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज दि. २७ मे, २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालय, मुंबई येथे गौरविण्यात आले. ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश अंकुश फडतरे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार मा. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या वेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
अविनाश फडतरे यांनी कोविड काळात जिल्हा परिषद सातारा येथे काम करताना प्रभावी नेतृत्व आणि विविध योजनांची अंमलबजावणी केली. जल जीवन मिशन, उपजीविका अभियान, ग्रामपंचायत डिजिटलायझेशन, स्वच्छ भारत मिशन, रोजगार हमी योजना यांसारख्या विविध उपक्रमांत त्यांनी ठळक कामगिरी बजावली आहे. त्यांच्या पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासनाची दखल शासन स्तरावर घेण्यात आली असून, त्यांना मिळालेला हा पुरस्कार ठाणे जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे.
जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी, तसेच सर्वच स्तरातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
०००