आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या संकल्पनेतून ठाणे कारागृहात, तेथील क्रांतीकारकांच्या संदर्भातील संग्रहालय लवकरच उभे राहणार असून ते दिवाळीपर्यंत सर्वांसाठी खुले होईल अशी माहिती आ. केळकर यांनी दिली. त्यांनी आज तज्ज्ञांसोबत कारागृहात जाऊन या संग्रहालयाची पाहणी केली आणि आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या संंग्रहालयाच्या निमित्ताने ठाणे कारागृहाचा इतिहास पुन्हा एकदा ठाणेकरांना पाहता येणार आहे. इतिहास अभ्यासक मकरंद जोशी यांनी इतिहास संदर्भातील माहिती पुरवली आहे. शिल्पकार वर्षा रेड्डी या शिल्पकला साकारत आहेत. इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचे देखील मार्गदर्शन मिळत आहे.
मंगळवारी आ. केळकर यांनी इतिहास अभ्यासक मकरंद जोशी, शिल्पकार वर्षा रेड्डी आणि प्रज्ञा म्हात्रे यांच्यासह जाऊन संग्रहालयाच्या कामाची पाहणी केली. यात १७३७ ते १९४७ सालात ठाणे मुक्ती संग्रामचा इतिहासासंदर्भात शिल्पकला तयार करण्याचे काम सुरू आहे. त्या कामाच्या पाहणीबरोबर ठाणेकर कलारसिकांना प्रवेश कुठुन द्यायचा, चौथऱ्यांवर क्रांतीकारकांची शिल्पे कशी उभारायची या संदर्भात कारागृह अधिक्षक राणी भोसले आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी जोशी आणि अय्यर यांनी देखील कशी शिल्पे उभारून त्या प्रसंगांची माहिती दिली जाईल यासदर्भात आ. केळकर यांना माहिती दिली. हे कार्लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी आ. केळकर यांच्या आमदार निधी आणि जिल्हा नियोजन समितीचा निधी यातून हे संग्रहालय उभारले जात आहे. क्रांतीकारकांची शिल्पे ही पाच फुटांची उभारली जाणार आहे.
हे पाहायला मिळणार
ठाणे कारागृहाच्या आधी या ठिकाणी ठाणे किल्ला होता. त्यामुळे किल्ला आणि कारागृहाचा इतिहास याचबरोबर पोर्तुगिजांनी हा किल्ला कसा बांधला, मराठ्यांनी तो कसा जिंकला, इंग्रजांनी त्याचे कारागृहात कसे रुपांतर केले या सर्व संदर्भातील शिल्पांची मांडणी तिथे होणार आहे. प्रत्येक शिल्पाखाली दोन ओळींत इतिहास लिहीला जाणार आहे. ठाणे शहरातील स्वतंत्र चळवळीतील प्रसंग कसे घडले ते या प्रदर्शनात पहायला मिळणार आहे.
जुना फाशी गेटदेखील या निमित्ताने ठाणेकरांना पाहता येईल. या जेलमध्ये राघोजी भांग्रे आणि अनंत कान्हेरे यांना फाशी देण्यात आली होती. वासुदेव बळवंत फडके, राघोजी भांग्रे, अनंत कान्हेरे आणि त्यांचे सहकारी, स्वा. विनायक दामोदर सावरकर अशा अनेक क्रांतीकारकांची शिल्पे उभारली जाणार आहेत.
आ. संजय केळकर : ठाणे हे ऐतिहासिक शहर आहे, केळकर : ठाणे हे ऐतिहासिक शहर आहे, हा ऐतिहासिक ठेवा जपणूक करण्याचा प्रयत्न या संग्रहालयाच्या माध्यमातून केला जात आहे. ठाणे कारागृह आणि आधीचा किल्ला हे महत्त्वाचे ठिकाण आहे. सामान्य नागरिकांना हा इतिहास बघून त्यातून प्रेरणा घेता यावी या उद्देशाने हे संग्रहालय उभारले जात आहे.