आमदार संजय केळकर यांच्या १८व्या आंबा महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन

शेतकऱ्यांसाठी ठाण्यात चळवळ;
मी ठाणेकर असल्याचा अभिमान..

  • हास्य कलाकार दत्तात्रय मोरे यांचे प्रतिपादन
  • आमदार संजय केळकर यांच्या १८व्या आंबा महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन

आमदार संजय केळकर यांचे काम आणि प्रत्यक्ष त्यांना पाहताच मी लहानाचा मोठा झालो, आणि त्यांच्याच कार्यक्रमाला मला उद्घाटक म्हणून निमंत्रित करण्यात आले, यासारखे भाग्य नाही. माझ्यासारख्या लहान कलाकाराला इथे बोलावून माझा जो सन्मान केला, त्याबद्दल मी आयोजकांचा खूप ऋणी आहे, अशा शब्दांत दत्तात्रय उर्फ दत्तू मोरे यांनी भावना व्यक्त केल्या.

आमदार संजय केळकर यांच्या संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी पणन मंडळाने पुरस्कृत केलेल्या १८व्या आंबा महोत्सवाचे उद्घाटन हास्य कलाकार दत्तात्रय उर्फ दत्तू मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी श्री. मोरे बोलत होते.

श्री. मोरे म्हणाले, मी देखील शेतकऱ्याचा मुलगा असून शेतकऱ्याच्या भावनांचा मला अनुभव आहे. हा केवळ बाजार नसून चळवळ आहे, या घोषवाक्यातूनच आमदार संजय केळकर साहेब यांचे शेतकऱ्यांवरील प्रेम दिसून येते. या महोत्सवातून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार मिळत असून तब्बल १८ वर्षे हा महोत्सव अखंडपणे सुरू आहे, यासाठी मी आयोजकांचे आभार मानतो, आणि मी ठाणेकर असल्याचाही मला अभिमान वाटतो, असे श्री. मोरे म्हणाले.

अनेकदा परराज्यातील आंबा कोकणातला हापूस आंबा म्हणून ग्राहकांच्या माथी मारला जातो, मात्र संस्कार संस्थेच्या माध्यमातून आयोजित होणाऱ्या या महोत्सवात कोकणातला अस्सल हापूस आंबा उपलब्ध झाला आहे. अगदी कोविडच्या काळातही हा महोत्सव झाला होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा महोत्सव म्हणजे चळवळ असून यातून शेतकऱ्यांना हात दिला जात असून ग्राहकांनाही वाजवी दरात अस्सल दर्जेदार हापूस आंबा मिळत आहे, असे आमदार निरंजन डावखरे म्हणाले.

आंबा महोत्सवाचे आयोजक तथा आमदार संजय केळकर म्हणाले, मी दोन दिवस कोकणामध्ये जाऊन आलो. जरा हवामान बदलले की आंब्यावर परिणाम होतो, म्हणून शेतकरी त्रस्त होतो, परंतु शेतकरी त्यांचा धीर आणि धैर्य सोडत नाही, त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी आपण छोटासा हातभार लावायला पाहिजे. हा कोकण आंबा महोत्सव ही एक प्रकारची चळवळ आहे. महोत्सवात दर्जेदार आंबा मिळत असल्याने ठाणेकर या महोत्सवात येतात. यावेळीही ठाणेकरांनी महोत्सवाला भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केळकर यांनी केले.

१ ते १२ मे या कालावधीत ठाण्याच्या गावदेवी मैदानात शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या या आंबा महोत्सवात, कोकणातील अस्सल हापूस, पायरी, रत्ना, केसर आंब्याबरोबरच, आंबा-फणस पोळी, सरबते, काजू, मालवणी मसाले, पापड अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे ४५ स्टॉल्स असणार आहेत. या महोत्सवात धान्य आणि कडधान्याचे पाच स्टॉल असणार असून महिला बचत गटांचेदेखील पाच स्टॉल असणार आहेत.

सुरुवातीला पाच कुमारिकांच्या हस्ते आंब्याच्या रोपाचे पूजन करण्यात आले तर मान्यवर पाहुण्यांना प्रथेप्रमाणे फळांची परडी श्री. केळकर यांच्या हस्ते देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून ऋषी देसाई यांनी अस्सल मालवणी भाषेत आंबा महोत्सवाचे गा-हाणे घातले.

महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार संजय केळकर, सौ. कमल संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, माजी नगरसेवक नारायण पवार, भरत चव्हाण, ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, ओमकार चव्हाण, भाजप व्यापारी सेलचे अध्यक्ष मितेश शहा, कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, संतोष साळुंखे, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम, राजेश गाडे, भाजयुमो अध्यक्ष सुरज दळवी, सचिन केदारी आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top