अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा करू नये’महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश


ठाणे : कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज पुरवठा करण्यात येऊ नये, असे मा. उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत. त्या अनुषंगाने, ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत महावितरण आणि टोरॅंट या दोन्ही वीज कंपन्यांनी या आदेशाचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा करण्यात येऊ नये तसेच, वीज पुरवठा करताना संबंधित बांधकाम अधिकृत असल्याची खातरजमा वीज कंपन्यांनी करावी, या संदर्भात, मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बुधवारी दुपारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात महापालिका अधिकारी, महावितरण कंपनी आणि टोरॅंट वीज कंपनी यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.
ज्या बांधकामासाठी वीज पुरवठा मागितला असेल त्या बांधकामांच्या अधिकृतपणाबाबत कागदपत्रांची खातरजमा केल्याशिवाय वीज पुरवठा न करणे हे वीज कंपन्यांचे कायदेशीर कर्तव्य आहे. केवळ प्रतिज्ञापत्र किंवा अर्ज यांच्या बळावर वीज पुरवठा करता येणार नाही. ही अतिशय महत्त्वाची आणि गंभीर बाब असून महापालिका आयुक्तांनी त्यासंदर्भात महावितरण आणि इतर वीज कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करावा. केवळ अधिकृत बांधकामालाच वीज पुरवठा केला जाईल यादृष्टीने पावले उचलावीत, असे मा. उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.
मा. उच्च न्यायालयाच्या या आदेशाची सविस्तर माहिती आयुक्त राव यांनी बैठकीत दिली. यासंदर्भात, आजपासून दोन्ही कंपन्यांनी बांधकामाच्या अधिकृतपणाची खात्री केल्याशिवाय वीज पुरवठा देऊ नये, असे स्पष्ट निर्देशही दिले. ग्राहकांना त्रास होऊ नये आणि अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा होऊ नये यादृष्टीने या परिस्थितीतून कंपन्यांनी वरिष्ठ पातळीवर मार्ग काढावा. त्यासाठी महापालिकेच्या शहर विकास विभागाचेही सहकार्य घ्यावे, अशी सूचनाही आयुक्त राव यांनी या बैठकीत केली.
विजेसाठी अर्ज केल्यानंतर किती काळात वीज पुरवठा दिला पाहिजे यासाठी जशी मार्गदर्शक तत्वे आहेत. त्याचप्रमाणे, अनधिकृत बांधकामांना वीज जोडणी देता येणार नाही, हेही मा. उच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे त्यासाठी तातडीने कार्यपद्धती निश्चित करावी, असेही आयुक्त राव म्हणाले.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे, उपायुक्त (मालमत्ता कर) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (अतिक्रमण विभाग) शंकर पाटोळे, उपनगर अभियंता (विद्युत) शुभांगी केसवानी, विधी अधिकारी मकरंद काळे, महावितरणचे मुख्य अभियंता संजय पाटील, अधिक्षक अभियंता युवराज मेश्राम, टोरॅंट कंपनीचे महाव्यवस्थापक (वितरण) प्रवीणचंद्र पांचाळ, सहमहाव्यवस्थापक विनय बहल, जनसंपर्क अधिकारी शशिकांत कोठेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top